प्रतिनिधी | मेहमूद्दीन शेख
वेळू, ता. कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील डोंगरी भागात वसलेल्या वेळू गावच्या कन्या सुहाना सय्यद शिकलगार हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे नवे शिखर गाठले आहे. सुहाना हिची एअर इंडिगोमध्ये निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल संपूर्ण गावातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वेळू हे छोटेसे गाव असून, या गावाला शेतकरी कुटुंबांचा आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वारशाचा समृद्ध इतिहास लाभला आहे. गावातील कर्तव्यनिष्ठ जवान नायब सुभेदार प्रमोद शिवाजी कदम, पैलवान सूर्यकांत पांडुरंग कुंभार आणि नायब सुभेदार सय्यदला रमजान शिकलगार यांच्या निवृत्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन ८ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आले होते.
याच कार्यक्रमात नायब सुभेदार सय्यदला रमजान शिकलगार यांच्या कन्या सुहाना सय्यद शिकलगार हिची एअर इंडिगोमध्ये निवड झाल्याबद्दल सरपंच, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.
आपल्या यशाबद्दल बोलताना सुहाना हिने सांगितले की, आपली जिद्द, वडिलांचे सहकार्य आणि आईचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले. बीए चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नोकरीसाठी मुलाखती दिल्या. सुरुवातीला दोन-तीन वेळा अपयश आले; मात्र तिने हार न मानता प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर परीक्षा उत्तीर्ण होऊन तिने आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले.
विमान प्रवासादरम्यान प्रवाशांची सेवा करण्यासोबतच आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने कसे कार्य करायचे, विविध प्रसंगांना कसे सामोरे जायचे, याचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. आज देश-विदेशातील प्रवाशांची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला.
“माझ्या गावातील ग्रामस्थ, माता-भगिनी, मान्यवर, हितचिंतक, पाहुणे आणि मित्रमंडळी यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मी सदैव ऋणी राहीन,” असे सुहाना हिने यावेळी सांगितले.
दरम्यान, सुहाना हिच्या यशाचा आनंद ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गावातील नागरिक, महिला, मान्यवर आणि जवानांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत निवृत्त जवानांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
डोंगरी भागातील छोट्याशा गावातून आलेल्या सुहानाने आपल्या मेहनतीच्या जोरावर एअर इंडिगोमध्ये मिळवलेले यश हे गावातील तरुणींसाठी तसेच युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.
न्युज मराठी लाईव्ह | कोरेगाव (सातारा)

टिप्पणी पोस्ट करा