वनविभागाची तत्काळ पाहणी; सायंकाळी पशुधन घराकडे आणण्याचे ग्रामस्थांना आवाहन
रानगेघर : जावली तालुक्यातील रानगेघर गावच्या डोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या दिसल्याची माहिती जागरूक शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी तातडीने गावात दाखल झाले आणि संबंधित परिसराची पाहणी केली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी डोंगर परिसरासह आजूबाजूच्या भागाची पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. विशेषतः सायंकाळच्या वेळी शेतकरी व नागरिकांनी एकट्याने डोंगर परिसरात जाणे टाळावे, तसेच आपले पशुधन शक्य तितक्या लवकर घराकडे आणावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिल्या.
बिबट्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि बिबट्या किंवा त्याच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह | रानगेघर (जावली)


टिप्पणी पोस्ट करा