प्रतिनिधी | निलेश सुर्वे
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पारडी परिसरात वीज वितरण विभागाच्या कथित गलथान कारभारामुळे एका उमद्या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. महादेव भानुदास पोहकर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीज वितरण विभागाच्या एका कर्मचाऱ्याने स्वतःचे कर्तव्य न बजावता वीजेसंदर्भातील काम करण्यासाठी शेतकरी महादेव पोहकर यांना सूचना दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. संबंधित काम सुरू असताना अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने महादेव पोहकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह खाली उतरू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि पोलिसांकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात नेमकी दुर्घटना कशी घडली, वीजपुरवठा का सुरू झाला आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्या सूचना दिल्या, याची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच जबाबदारी निश्चित होणार आहे.
न्युज मराठी लाईव्ह | हिंगोली

टिप्पणी पोस्ट करा