सातारा (नागठाणे) : यतिमखाना व दारुल उलुम एज्युकेशन संस्था, नागठाणे संचलित सातारा उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षकदिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण शिबिर तसेच सिरातुन्नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विभाग, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष शफिक शेख होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले उपस्थित होते. यावेळी हवालदार निलेश गायकवाड, धीरज महाडीक, प्रशांत चव्हाण, सुमित साळुंखे, हारून काझी, नजीर शेख तसेच माजी तहसीलदार मोमीन साहेब यांच्यासह मदरसा व शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शफिक शेख यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे प्रशांत हुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अस्लमभाई सुतार यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे प्रशांत हुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘गुड टच-बॅड टच’ बाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच मोबाईल व टेलिव्हिजनच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम समजून घेऊन विद्यार्थ्यांनी त्यापासून योग्य अंतर ठेवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण सर, पाटील सर, मुफ्ती अहमद बागवान, मौलाना अशपाक, मुख्याध्यापक हसन अली सर, हाफीज अरबाज व शिक्षकवृंद यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण कारी नियामत आगा यांनी केले. समारोपप्रसंगी मुफ्ती अहमद बागवान यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वृक्षारोपण आणि सिरातुन्नबी प्रश्नमंजुषा यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासोबतच नैतिक, सामाजिक व शैक्षणिक मूल्यांची जडणघडण व्हावी, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
न्यूज मराठी लाईव्ह | नागठाणे (सातारा)


टिप्पणी पोस्ट करा