आलेवाडीतील श्री स्वामी समर्थ बचत गटाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद


कुडाळ (जावली) : आलेवाडी येथे कार्यरत असलेल्या श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या महिला सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आलेवाडी येथे स्वच्छता अभियान राबविले. बचत गटाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

श्री स्वामी समर्थ बचत गटातील सर्व महिला सदस्यांनी शाळेला अचानक भेट देत शाळा परिसराची स्वच्छता केली. शाळेच्या इमारतीच्या आजूबाजूला वाढलेले गवत, अनावश्यक झुडपे तसेच बागेतील कचरा व इतर अडथळे दूर करून संपूर्ण परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला. महिलांच्या श्रमदानामुळे शाळा परिसराला स्वच्छ आणि सुंदर रूप प्राप्त झाले.

यावेळी बचत गटाच्या निमंत्रक सौ. दीपिका संतोष पवार यांनी, “शालेय कार्यात आमचे योगदान आणि श्रमदान यापुढेही नेहमीच राहील,” अशी ग्वाही दिली.

महिला सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने कौतुक करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल पवार, उपाध्यक्ष श्री. नवनाथ बिरामणे, सर्व सन्माननीय सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. नितीन जाधव यांनी श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या या उपक्रमाबद्दल आभार मानत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

महिलांनी केवळ बचत गटापुरते मर्यादित न राहता सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने श्री स्वामी समर्थ बचत गटाचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


बातमी | सौ.धनवंती पवार

न्यूज मराठी लाईव्ह | कुडाळ (जावली)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने