प्रतिनिधी | श्री.संजय वांगडे
मेढा (करंजे) : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा सण. याच सणाचे औचित्य साधत करंजे गावची कन्या कु. श्रद्धा धनावडे हिने विश्वंभर बाबा अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. संस्थेतील तब्बल ७० मुलांना राख्या बांधून तिने बहीण-भावाच्या स्नेहाचे नाते जपले.
रक्षाबंधनासाठी संस्थेतील काही मुले आपल्या घरी गेली होती. मात्र संस्थेत उपस्थित असलेल्या मुलांना राखी बांधण्यासाठी कोणी नसल्याचे लक्षात येताच श्रद्धा धनावडे हिने पुढाकार घेत राख्यांचे नियोजन केले आणि संस्थेत जाऊन उपस्थित ७० मुलांच्या मनगटावर प्रेमाने राखी बांधली.
राखी बांधताना संस्थेत आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. राखी बांधल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह विशेष पाहायला मिळाला. या उपक्रमामुळे मुलांना बहिणीच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सुंदर अनुभव मिळाला.
रक्षाबंधन हा सण केवळ रक्ताच्या नात्यांपुरता मर्यादित न राहता प्रेम, माणुसकी, जिव्हाळा आणि बंधुभावाची नाती जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. करंजे गावच्या कन्येने पुढाकार घेत ७० मुलांना राखी बांधल्याने हा रक्षाबंधन सोहळा विशेष ठरला.
विश्वंभर बाबा वारकरी संस्थेतील मुलांसाठी हा दिवस आनंददायी आणि कायम स्मरणात राहणारा ठरला. सामाजिक बांधिलकी जपत सण साजरा करण्याच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांसह उपस्थितांनी कौतुक केले.
‘नाते रक्ताचे असो वा माणुसकीचे, प्रेम आणि आपुलकी हीच खरी राखी’ असा सुंदर संदेश या अनोख्या रक्षाबंधन सोहळ्यातून समाजासमोर आला.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. अतुल महाराज देशमुख तसेच जावली तालुक्यातील विविध स्तरांतून कु. श्रद्धा धनावडे हिचे आभार मानण्यात आले.
न्यूज मराठी लाईव्ह | मेढा (जावली)


टिप्पणी पोस्ट करा