चिमुकल्या बहिणींच्या हातून सीमेवरील वीरांसाठी प्रेमाची राखी; पर्यावरणपूरक रक्षासूत्रातून जवानांना कृतज्ञतेची सलामी


सातारा : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना आपल्या कुटुंबापासून, सण-उत्सवांपासून आणि आप्तेष्टांपासून दूर राहणाऱ्या वीर जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी जावली तालुक्यातील कुडाळ येथील PM SHRI जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी अनोखा उपक्रम राबविला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या फौजी भावांसाठी त्यांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या असून, त्यासोबत प्रेम, आदर आणि कृतज्ञतेने ओथंबलेली भावूक पत्रेही पाठविली आहेत.

रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या भावनेचा उत्सव. याच भावनेला देशप्रेमाची जोड देत शाळेने जवानांसाठी राखी पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला. ‘आपल्या देशाचे रक्षण करणारे जवान हेही आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत,’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा सुंदर प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने स्वतःच्या हाताने सुंदर आणि आकर्षक राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे या राख्या पर्यावरणपूरक पद्धतीने गायीच्या शेणापासून तयार करण्यात आल्या. त्यामुळे रक्षाबंधनाच्या आनंदासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.

या प्रेमरूपी राख्या जय हिंद फाउंडेशनचे सचिव उमेश मोरे व सुलभाताई लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यांच्या माध्यमातून या राख्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचणार आहेत. चिमुकल्या हातांनी तयार केलेली ही रक्षासूत्रे जेव्हा देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या जवानांच्या मनगटावर बांधली जातील, तेव्हा त्या प्रत्येक धाग्यात विद्यार्थ्यांचे प्रेम, देशभक्ती आणि कृतज्ञता सामावलेली असेल.

पत्रांतून उमटला निरागस देशप्रेमाचा स्वर..!

राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी जवानांसाठी मनापासून लिहिलेली हस्तलिखित पत्रेही पाठविली. या पत्रांतून त्यांच्या निरागस मनातील कृतज्ञता आणि देशप्रेम ओसंडून वाहताना दिसते.

“तुम्ही सीमेवर जागता म्हणून आम्ही शाळेत निर्धास्तपणे शिकतो. तुम्ही ऊन, वारा, पाऊस आणि थंडी सहन करून देशाचे रक्षण करता, म्हणून आम्ही आमचे बालपण आनंदाने जगतो. तुमच्या शौर्यामुळे आमचा तिरंगा अभिमानाने फडकतो. आमच्यासाठी तुम्ही देशाचे रक्षकच नाही, तर आमचे फौजी भाऊ आहात. ही राखी तुमच्या मनगटावर बांधली जाईल, तेव्हा आमचे प्रेम आणि शुभेच्छा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्ही सदैव सुखी आणि सुरक्षित राहा, हीच आमची प्रार्थना,”अशा भावना विद्यार्थ्यांनी पत्रांतून व्यक्त केल्या.

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीरांच्या मनगटावर बांधली जाणारी ही राखी म्हणजे केवळ धागा नसून, देशातील असंख्य बहिणींच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. चिमुकल्या विद्यार्थिनींच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून रक्षाबंधनाला देशभक्तीची सुंदर किनार लाभली असून, त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


न्यूज मराठी लाईव्ह | सातारा (जावली) 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने