वीरपत्नी ताराजी ओंबळे यांच्या हस्ते मेढा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन

बातमी | श्री.विलास दरेकर


मेढा, दि. १२ सप्टेंबर २०२६ : मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, मुंबई व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार मेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या लोक अदालतीचे उद्घाटन २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे शहीद तुकारामजी ओंबळे यांच्या वीरपत्नी श्रीमती ताराजी तुकाराम ओंबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या कन्या वैशाली ओंबळे यांचीही उपस्थिती होती.

शहीद तुकारामजी ओंबळे यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य आणि प्रसंगावधान दाखविले. राष्ट्रासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करून सन्मानित केले. अशा वीर शहीदाच्या वीरपत्नीच्या हस्ते लोक अदालतीचे उद्घाटन होणे हा मेढा न्यायालयासाठी भावपूर्ण व प्रेरणादायी क्षण ठरला.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये एकूण ४५ प्रकरणांचा समोपचाराने निपटारा करण्यात आला असून, ५ लाख २९ हजार २९४ रुपयांची वसुली झाली. दिवाणी, फौजदारी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८, कौटुंबिक प्रकरणे, बँकिंग वसुली तसेच दाखलपूर्व प्रकरणांचा यामध्ये समावेश होता.

राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन करताना वीरपत्नी श्रीमती ताराजी तुकाराम ओंबळे व डॉ. विक्रम अंबादास आव्हाड, न्यायाधीश, दिवाणी व फौजदारी न्यायालय, मेढा.

यावेळी जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर. एस. पोफळे यांनी लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोड करून पक्षकारांनी अमूल्य वेळ वाचवावा, तसेच अहंकार बाजूला ठेवून परस्पर सामंजस्याने वाद मिटवावेत, असे आवाहन केले.

ॲड. पी. डी. गोरे यांनी, तंटे आपणच निर्माण करतो आणि ते मिटविण्याची क्षमताही आपल्यामध्येच असते. त्यामुळे लोक अदालतीचा लाभ घेऊन प्रकरणे समोपचाराने मिटवून घ्यावीत, असे सांगितले.

न्यायाधीश डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी लोक अदालत हे आपापसातील वाद सामंजस्याने संपुष्टात आणण्यासाठी प्रभावी माध्यम असून, “लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या हितासाठी” आयोजित केलेले हे व्यासपीठ असल्याचे सांगितले. लोक अदालतीमध्ये तडजोड करून पक्षकारांनी वेळ व खर्चाची बचत करावी, असेही त्यांनी नमूद केले.

शहीद तुकारामजी ओंबळे यांच्या शौर्याचा गौरव करताना डॉ. विक्रम अंबादास आव्हाड यांनी त्यांच्या राष्ट्रसेवेचे स्मरण करून त्यांचे शौर्य आजच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.

सदर लोक अदालतीच्या पॅनेलवर डॉ. विक्रम आव्हाड व ॲड. पी. डी. गोरे यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमास जावली तालुका वकील संघाचे अध्यक्ष व सदस्य, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. श्रीनिवास कणसे, मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील, ॲड. विशाल महाडिक, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे अधिकारी व व्यवस्थापक तसेच विद्युत पारेषण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. लिंगडे यांनी केले. राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जावली तालुका वकील संघ, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील तसेच न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🇮🇳 शौर्याला सलाम!

शहीद तुकारामजी ओंबळे यांचे राष्ट्रासाठीचे सर्वोच्च बलिदान आणि अतुलनीय शौर्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या वीरपत्नी श्रीमती ताराजी ओंबळे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन होणे हा मेढा न्यायालयासाठी निश्चितच भावपूर्ण आणि अभिमानास्पद क्षण ठरला.




न्यूज मराठी लाईव्ह  | मेढा (जावली)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने