मेढ्याच्या आदित्य खटावकरची ‘सीएमए’ पदवीला गवसणी; कॉमर्स क्षेत्रात उल्लेखनीय यश

प्रतिनिधी | बजरंग चौधरी

मेढा : मेढा येथील सुप्रसिद्ध ड्रेस लँड टेलरचे मालक तसेच सातारा जिल्हा संत नामदेव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन धनंजय खटावकर यांचा मुलगा आदित्य धनंजय खटावकर याने कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर सीएमए (Cost and Management Accountant) ही उच्च व्यावसायिक पदवी संपादन केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मेढा व परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

आदित्यचे प्राथमिक शिक्षण मेढा येथे झाले. त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने क्रांती विद्यालय, सावली येथे पूर्ण केले. पुढे डी.जी. कॉलेज, सातारा येथून बी.कॉम.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथे उच्च शिक्षण घेत त्याने सीएमए ही प्रतिष्ठित व्यावसायिक पदवी संपादन केली.

आदित्य हा सामाजिक कार्यकर्ते कै. दत्तात्रय सखाराम खटावकर गुरुजी यांचा नातू असून, मेढ्यातील सुप्रसिद्ध ड्रेस लँड टेलरचे मालक धनंजय खटावकर यांचा सुपुत्र आहे. सामाजिक जडणघडण आणि शैक्षणिक संस्कारांची पार्श्वभूमी लाभलेल्या आदित्यने आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.

सीएमएच्या अभ्यासासाठी मेढ्यातील बालभारतीचे अभ्यासक अनिल कापरे सर यांचे आदित्यला विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अभ्यासाला योग्य दिशा मिळाल्याचे आदित्यने सांगितले.

आजच्या काळात अनेक विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे असताना आदित्यने कॉमर्स क्षेत्राची वेगळी वाट निवडली. या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार करून त्याने सातत्यपूर्ण मेहनत घेतली आणि कॉमर्समधील उच्च व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्वाचे शिखर गाठले.

आदित्यच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक, मार्गदर्शक, मित्रपरिवार तसेच मेढा व सावली परिसरातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही कॉमर्स क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असा प्रेरणादायी संदेश आदित्यच्या यशातून मिळत आहे.


न्यूज मराठी लाईव्ह | मेढा (जावली) 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने