सातारा : जावली तालुक्यातील राणगेघर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावावरून मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व मानल्या जाणाऱ्या गावात माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाने ५ विरुद्ध ४ अशा एका मताच्या निसटत्या फरकाने ठराव आपल्या बाजूने खेचत महत्त्वाचा राजकीय विजय मिळवला. त्यामुळे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या बालेकिल्ल्यातच शिंदे गटाने मोठा राजकीय धक्का दिल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठराव अत्यंत महत्त्वाचा मानला जात असल्याने दोन्ही गटांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. बैठकीला दोन्ही गटांचे सर्व संचालक उपस्थित राहिल्याने मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि संपूर्ण वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान, ठरावाच्या वेळी एक वेगळाच राजकीय पेच निर्माण झाला. सोसायटीचे चेअरमन यांच्या विरोधातील गटाने त्यांच्या सुपुत्राचेच नाव ठरावासाठी सुचविल्याने काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, चेअरमन यांनी राजकीय चातुर्य दाखवत आपल्या गटातील उमेदवाराच्या बाजूने ठराव मांडला, ज्याला त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर झालेल्या मतदानात शशिकांत शिंदे समर्थक गटाने एका मताच्या फरकाने बाजी मारली.
राणगेघर हे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रभावाखालील गाव मानले जाते. अशा ठिकाणी विरोधी गटाला मिळालेला हा विजय आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी जावली तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता या निकालाचे पडसाद पुढील ठराव प्रक्रियेसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
सातारा | जावली

टिप्पणी पोस्ट करा