सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठरावावरून जावलीत राजकीय घडामोडींना वेग; जयदीप शिंदे यांना धक्का?

 कुडाळ (जावली) | प्रतिनिधी

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक निवडीसाठी ठराव प्रक्रिया सुरू होताच जावली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः जावली-महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे यांना या प्रक्रियेत धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावली तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या सोनगाव विकास सेवा सोसायटीचा ठराव नेमका कोणाच्या बाजूने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सन 2022 मध्ये झालेल्या सोनगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे गटाचा पराभव करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील गटाने विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर सोसायटीमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र आहे.

खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, सोसायटीचे चेअरमन अमित शिंदे, तसेच अनिकेत निगडे आणि गणपत शिंदे यांनी स्वतंत्र भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत जयदीप शिंदे यांच्या बाजूने ठराव न देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सोनगाव विकास सेवा सोसायटीची एकूण सदस्यसंख्या 13 असली तरी एक सदस्य अपात्र ठरल्याने सध्या 12 सदस्य आहेत. त्यामुळे दोन्ही गटांकडे प्रत्येकी समान संख्याबळ असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी, ठराव मंजूर होणार कोणाच्या बाजूने, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांकडून ठराव मंजुरीचा दावा केला जात असून, अंतिम निर्णय चेअरमनच्या निर्णायक मतदानावर अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे जावली तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली असून, सोनगावचा ठराव अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दालनात जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

(टीप : या वृत्तातील काही दावे स्थानिक राजकीय चर्चांवर आधारित असून संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.)



न्यूज मराठी लाईव्ह | कुडाळ (जावली) 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने