जावली : पुण्यानुमोदन दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपणासारखा पर्यावरणपूरक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आल्याने सामाजिक स्तरावर एक आदर्श निर्माण झाला आहे, असे मत बौद्धाचार्य दशरथ कांबळे यांनी व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हा संस्कार प्रमुख आयु. दत्तात्रय जाधव व जावली तालुका कोषाध्यक्ष आयु. चंद्रकांत जाधव यांच्या मातोश्री कै. जमुनाबाई जाधव (वय 95) यांचे 19 एप्रिल 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जन दिनी जाधव कुटुंबाला भारतीय बौद्ध महासभा, जावली यांच्या वतीने बोधी वृक्ष भेट देण्यात आला.
पारंपरिक पद्धतीप्रमाणे अस्थी पाण्यात विसर्जित न करता, जाधव कुटुंबाने आपल्या जागेत खड्डा करून त्या अस्थी पुरल्या व त्यावर पिंपळाचे झाड लावले. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक जाणीव जागृत करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमास जाधव कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) जावली तालुका अध्यक्ष मा. एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा महासचिव दशरथ कांबळे, जावली तालुका अध्यक्ष आयु. संतोष खरात, वाई तालुका सचिव आयु. प्रमोद मोतलिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यानुमोदन व शोकसभेत बोलताना मा. एकनाथ रोकडे यांनी सांगितले की, भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून वृक्षारोपणाची संकल्पना राबविली जात असून आतापर्यंत १७५ पेक्षा अधिक पिंपळाची झाडे लावण्यात आली आहेत.
दशरथ कांबळे यांनी आपल्या भाषणात बौद्ध समाजासमोरील आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, “समाजाची दिशा बदलत आहे. धम्म समजून घेणे आणि त्यानुसार आचरण करणे आज अत्यंत आवश्यक आहे. तरुण पिढीने या मार्गावर चालण्याची गरज आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांची अंमलबजावणी करणे ही काळाची गरज असून त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे अधिक महत्त्वाचे आहे.
या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक आणि धार्मिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.
न्यूज मराठी लाईव्ह | जावली / सातारा





टिप्पणी पोस्ट करा