कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कडेगाव : नगरपंचायतीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने गणेश भोसले यांची स्वीकृत बिनविरोध नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक समतेचा आदर्श निर्णय म्हणून या निवडीकडे पाहिले जात आहे.
संग्राम भाऊ देशमुख व पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडीमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांना नवी दिशा मिळाल्याचे बोलले जात आहे. गणेश भोसले हे अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठा राखून कार्यरत असून, त्यांनी संघटनात्मक तसेच सामाजिक क्षेत्रात सातत्याने योगदान दिले आहे.
अत्यंत सामान्य, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातून आलेल्या भोसले यांनी कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला असून, सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
या निवडीमुळे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय व समतेच्या विचारांना न्याय दिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देत समावेशक नेतृत्वाचा आदर्श घालून दिल्याचे मत व्यक्त होत आहे.
गणेश भोसले यांचा सर्वसमावेशक स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि विरोधकांशी सुसंवाद राखण्याची भूमिका यामुळे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विरोधकांकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
या निवडीमुळे कडेगाव नगरपंचायतीतील तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात गणेश भोसले नगरसेवक म्हणून जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून विकासाला गती देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा