धोम धरणाचे पहिले आवर्तन २० ऑक्टोबरपर्यंत सोडा; अन्यथा आंदोलनाचा इशारा!

डाव्या-उजव्या कालव्यांची तातडीने डागडुजी करण्याची धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची मागणी; कालव्यांना भगदाडे पडल्याने शेतकरी चिंतेत

धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने सातारा सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना पदाधिकारी.

सातारा : धोम धरण १०० टक्के भरलेले असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. डाव्या व उजव्या कालव्यांची तातडीने डागडुजी करून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत सोडण्यात यावे, अशी मागणी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मागणीची अंमलबजावणी न झाल्यास वाई, सातारा, जावळी व कोरेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

धोम धरणाच्या लाभक्षेत्रात वाई, सातारा, जावळी व कोरेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. या परिसरात पाऊस उघडून जवळपास महिनाभर झाला असून, सध्या उभ्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. मात्र, धोम धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांना अनेक ठिकाणी भगदाडे पडल्याने पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने गेल्या दोन महिन्यांपासून सातारा सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची निवेदने व बैठकांच्या माध्यमातून वारंवार भेट घेऊन कालव्यांच्या दुरुस्तीसाठी यांत्रिकी विभागाकडून यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र, यंत्रसामग्रीसाठी लागणाऱ्या इंधनाकरिता शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा समितीने निवेदनात केला आहे. त्यामुळे कालव्यांच्या दुरुस्तीच्या कामाला विलंब होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

आचारसंहितेमुळे पाणी सोडण्यास विलंब होऊ नये

सध्या पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. आचारसंहितेमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक घेता आली नाही, तर पाणी सोडण्याचे नियोजन रखडू शकते, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

यापूर्वीही निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे कारण देऊन सुमारे महिनाभर कालव्यांना पाणी सोडण्यात आले नव्हते. धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अनुभव समितीने निवेदनात नमूद केला आहे. त्यामुळे यंदा अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

२० ऑक्टोबरपर्यंत आवर्तन सोडण्याची मागणी

धोम धरणातून एक आवर्तन सोडण्याचा अधिकार अधीक्षक अभियंत्यांना असल्याचे नमूद करत, आचारसंहितेच्या कारणास्तव पाणी सोडण्यास विलंब करू नये, अशी भूमिका समितीने मांडली आहे. डाव्या व उजव्या कालव्यांवरील दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

वेळेत पाणी उपलब्ध झाल्यास उभ्या पिकांचे संभाव्य नुकसान टाळता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे समितीने म्हटले आहे. मागणीची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास वाई, सातारा, जावळी व कोरेगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रावसाहेब बर्गे, कार्याध्यक्ष रणजीत शिवाजीराव फाळके आणि सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दगडू माने (पाटील) यांच्या स्वाक्षऱ्यांनी हे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.



बातमी | श्री.आनंद गंगावणे 

न्यूज मराठी लाईव्ह | सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने