सातारा : सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळावा, तसेच शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी इत्तेहाद सोशल वेल्फेअर, सातारा या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविणे पालकांसाठी कठीण होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेच्या संधीपासून वंचित राहू नये, अशी भूमिका संस्थेने मांडली आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये, यासाठी संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शिक्षण विभागाला स्पष्ट सूचना द्याव्यात. यापूर्वी शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार परतावा देण्याबाबतही कार्यवाही करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
शासनाच्या सवलतींचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या भविष्यावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन इत्तेहाद सोशल वेल्फेअरच्या वतीने करण्यात आले आहे.
निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. नागेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी इत्तेहाद सोशल वेलफेयर चे जुबेर शेख, इम्रान शेख, अजीम बागवान, जमीर शेख, गुफरान शेख, शाहरुख शेख आदी उपस्थित होते.
बातमी | श्री.विलास दरेकर
न्यूज मराठी लाईव्ह | सातारा

टिप्पणी पोस्ट करा