मेरू विद्यामंदिर वाघेश्वर येथील दहावीच्या ५७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ मोफत
मेढा (जावली) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब, ठाणे आणि वेण्णा फाऊंडेशन, ओझरे यांच्या पुढाकारातून तसेच प्रमोद इंगुळकर सर यांच्या माध्यमातून मेरू विद्यामंदिर, वाघेश्वर (ता. जावली) येथील इयत्ता दहावीच्या ५७ विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ मोफत उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अभ्यासाची उजळणी आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत मिळणार आहे.
‘आयडियल स्टडी ॲप’मध्ये सर्व विषयांची सखोल माहिती, स्वाध्याय, कृतिपत्रिका, महत्त्वाचे प्रश्न, नमुना प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि शैक्षणिक व्हिडिओंचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत प्रति विद्यार्थी १,५०० रुपये याप्रमाणे एकूण ८५ हजार ५०० रुपयांची शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्यात आली. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना समजून घेणे, प्रश्नांचा सराव करणे आणि दहावीच्या परीक्षेची प्रभावी तयारी करणे शक्य होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक डिजिटल शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या वितरण सोहळ्याला ओझरे गावचे सरपंच अजितराव मर्ढेकर, अशोकराव लकडे गुरुजी, भास्करराव मर्ढेकर गुरुजी, युवा उद्योजक सुनील मर्ढेकर, व्यावसायिक संतोष मर्ढेकर, युवा उद्योजक राजू जाधव, इंजिनियर श्रीधर मर्ढेकर, मेरू विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद घाडगे सर, विशाल लाड सर, वाघमारे सर आणि सावंत सर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल नवी मुंबई येथील अमिता कळंबे मॅडम यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. उपक्रमाचे समन्वयक प्रमोद इंगुळकर सर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लाड सर यांनी केले.
प्रतिनिधी | बजरंग चौधरी
न्यूज मराठी लाईव्ह | मेढा (जावली)

टिप्पणी पोस्ट करा