जावली तालुक्यातील आर्डे गावात घरात घुसून थरारक खून; पत्नी-मुलीसमोर धारदार शस्त्रांनी हल्ला


 गावातीलच आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

कुडाळ (जावली) : सातारा जिल्ह्यातील जावली तालुका परिसरात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील आर्डे गाव येथे घरात घुसून ५४ वर्षीय आगतराव बाबुराव जाधव यांची निर्घृण हत्या करण्यात आली. पत्नी आणि मुलीसमोरच झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

५४ वर्षीय आगतराव बाबुराव जाधव

मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ वादाच्या कारणावरून आरोपींनी जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर काठी, कोयता, कुराड तसेच इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. सहा ते आठ जणांच्या टोळीने केलेल्या या अमानुष मारहाणीत आगतराव जाधव गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी गावातीलच दोन महिलांसह आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवला आहे.

या घटनेमुळे जावली तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



न्यूज मराठी लाईव्ह 

जावली / सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने