साताऱ्यातून स्कॉर्पिओने कोकणात फिरायला गेले, रात्रीच्या अंधारात घात; आंबेनळी घाटातील मृत 8 तरुणांची नावे समोर

 

सातारा : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या तरूणांची स्कार्पिओ कार आंबेनळी घाटात जवळपास 1 हजार फूट दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 8 तरूण जागीच ठार झाले आहेत. रात्रीपासून महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अॅण्ड रेस्क्यू टीम तसेच प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.


आंबेनळी घाटात स्कार्पिओ कार 1000 फूट दरीत कोसळून कारमधील सर्वच्या सर्व 8 तरूणांचा मृत्यू झाला आहे. मृत तरूण हे आसगाव (ता. कोरेगाव) येथील रहिवाशी होते. मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20,), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 35 ) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) या तरुणांचा समावेश आहे.


आंबेनळी घाटातील दरीत कोसळेली कार (क्र. MH 11 DN 2340) ही सातारा जिल्ह्यातील आसगाव (ता. कोरेगाव) येथील आहे. खोल दरीत कार कोसळल्याने सर्व तरूण जागीच ठार झाले असून स्कार्पिओ कारचा चेंदामेंदा झाला आहे. सध्या मृतदेह दरीतून वर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात हा अपघात घडला. वीकेंडला पर्यटनाचा आनंद घेऊन कोकणातून पुन्हा साताऱ्याकडे परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.


सोमवारी सकाळीही शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू ठेवण्यात आले असून, घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नातेवाईक आणि स्थानिक प्रशासन उपस्थित आहे. वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकांकडून विशेष तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे.


2018 च्या महाभयंकर बस दुर्घटनेची आठवण ताजी

ज्या परिसरात हा अपघात घडला आहे, त्याच ठिकाणी 2018 मध्ये कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरात स्कॉर्पिओ कारला अपघात झाल्यामुळे बस अपघाताच्या दुर्दैवी आठवणी ताज्या झाल्या आहेत.



न्यूज मराठी लाईव्ह | सातारा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने