साताऱ्यात वर्षावास उद्घाटन सोहळ्याचे आयोजन; बौद्धाचार्य सन्मानपत्रांचेही वितरण


सातारा : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा यांच्या वतीने वर्षावास उद्घाटन 2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सभामंडप येथे संपन्न होणार असून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत पाळल्या जाणाऱ्या वर्षावासाचे महत्त्व यावेळी विशद करण्यात येणार आहे.

कार्यक्रमामध्ये सन 2025-2026 या कालावधीत उल्लेखनीय धम्मकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘बौद्धाचार्य सन्मानपत्र’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा यांनी केले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जावली यांच्या वतीने विशेष सहकार्य करण्यात येत आहे.

कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक तेजस कांबळे हे “भारतीय बौद्ध महासभा नियमावली व संस्था कार्य” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

वर्षावास उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष एकनाथ रोकडे, राज्य कोषाध्यक्ष वसंत चव्हाण तसेच सातारा जिल्हा संस्कार प्रमुख दत्तात्रय जाधव उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष कुमार सुर्वे, जिल्हा महासचिव दशरथ कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष गौतम माने, जिल्हा महिला अध्यक्षा द्राक्षा खंडकर, जिल्हा पर्यवेक्षक सचिव अनिल शिंदे, जिल्हा शिक्षण विभाग सचिव रवींद्र सोनवले आणि जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जावली तालुका अध्यक्ष संतोष खरात, पाटण तालुका अध्यक्ष राहुल रोकडे, सातारा तालुका अध्यक्ष राहुल कांबळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष संजय रोकडे, वाई तालुका अध्यक्ष अमित कांबळे तसेच खटाव व मान तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

बौद्ध धम्मातील वर्षावास परंपरेचे महत्त्व, संघटनात्मक कार्याची दिशा आणि धम्मप्रसारासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा गौरव अशा विविध उपक्रमांमुळे या कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह | सातारा 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने