भूजल पातळी खालावल्याने रब्बी पिके धोक्यात; हळद व तूर पिके वाळण्यास सुरुवात!
केंद्रा खुर्दसह परिसरातील विहिरी व बोअरवेल कोरड्या; शेतकरी आर्थिक संकटाच्या चिंतेत, शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी
हिंगोली : जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द परिसरात भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठा कमी होऊन त्या कोरड्या पडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी हळद व तूर पिके वाळण्यास आणि करपण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
केंद्रा खुर्द, हिवरा नजीकचे माहेरखेडा, केंद्रा बुद्रुक, मनास पिंपरी आणि गुगल पिंपरी या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूजल पातळीत घट होत असल्याचे चित्र आहे. या परिसरात सिंचनासाठी तलाव किंवा धरणाचा आधार उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना प्रामुख्याने विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र, यंदा विहिरी व बोअरवेल कोरड्या पडू लागल्याने शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
सध्या शेतात उभी असलेली हळद आणि तूर ही पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. आगामी काळात हरभरा आणि गहू या रब्बी पिकांवरही भूजल पातळी खालावल्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. वेळेत पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
आधीच नैसर्गिक परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रब्बी हंगामातील पिके वाचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील पाणीटंचाईची तातडीने दखल घेऊन परिस्थितीचा सर्वे करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
प्रतिनिधी | निलेश सुर्वे
न्यूज मराठी लाईव्ह | हिंगोली

