कराड | प्रतिनिधी – श्री.अनिल मोरे
कराड : कराड–मसूर राज्य महामार्गालगत सैदापूर परिसरातील कॅनॉलजवळ अनेक वर्षांपासून रखडलेला मुख्य गटारीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा दीर्घकालीन प्रश्न सुटल्याने शेकडो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भागातील मुख्य गटार अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व आजूबाजूच्या परिसरात साचत होते. परिणामी दुर्गंधी, डासांची वाढ आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होत होती. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा विशेष त्रास सहन करावा लागत होता.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा याबाबत ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. अखेर पंचायत समिती सदस्या सौ. माधवी नाना पाठसुपे यांनी पुढाकार घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला.
या कामात सैदापूर गावचे सरपंच फत्तेसिंह जाधव (भैय्या), उपसरपंच अनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य कुमार देसाई, बांधकाम उपअभियंता टोपे साहेब तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सर्वांच्या समन्वयातून प्रत्यक्ष जागेची पाहणी करून गटारीतील अडथळे दूर करण्यात आले आणि पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजी होती; मात्र आता प्रश्न सुटल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. गटारीचा प्रश्न मार्गी लागल्याने स्वच्छता सुधारेल, डासांचे प्रमाण कमी होईल आणि संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले असून, भविष्यातही नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा