प्रतिनिधी : श्री.मंदार वैद्य
कुडाळ (जावली) : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तसेच गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी बसची मागणीही प्रचंड वाढली असून, प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तातडीने अतिरिक्त व नियमित सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रानगेघर–ठाणे ही एसटी बस सेवा प्रथमच मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी रात्री ९ वाजता रानगेघर येथून सुरू करण्यात आली होती. ही बस पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास ठाणे एसटी आगारात पोहोचली. या बसचा मार्ग मेढा, आलेवाडी, दरे, करंदी, रानगेघर, इंदवली, आखाडे, हुमगाव, कुडाळ, पाचवड, शिरवळ, वाशी मार्गे ठाणे असा आहे.
ठाणे येथून ही बस १८ मार्च रोजी रात्री १० वाजता सुटून पहाटे ५ वाजता रानगेघर येथे पोहोचली. मात्र त्यानंतर ही सेवा नियमित न राहता फक्त पुढील दोन रविवारी रानगेघरहून आणि ४ एप्रिल रोजी शनिवारी ठाणेहून चालविण्यात आली. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
सध्या बसचे रिझर्व्हेशन उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही बस मेढा आगारातून रिझर्व्हेशनसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी या मार्गाचा विस्तार करहरपर्यंत करण्यात यावा, अशीही मागणी पुढे येत आहे.
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस गावाकडून मुंबईकडे जाण्यासाठी एसटीची कोणतीही नियमित सेवा नसल्याने प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, ज्यामुळे आर्थिक व सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत.
या मार्गावरील सर्व गावांतील नागरिक व प्रवासी यांची एकमुखी मागणी आहे की, रानगेघर–ठाणे एसटी बस सेवा दररोज नियमित चालवावी आणि रिझर्व्हेशनची सुविधा सुरू करावी. त्यामुळे प्रवाशांना विश्वासाने प्रवास करता येईल व गोंधळ टळेल.
प्रवाशांच्या अडचणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून ही सेवा कायमस्वरूपी सुरू करावी, अशी नम्र विनंती नागरिकांकडून करण्यात येत आहे. 🙏
न्युज मराठी लाईव्ह
कुडाळ / जावली

टिप्पणी पोस्ट करा