कुडाळ (जावली) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरीत विविध मोफत आरोग्य शिबिरांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वामी मंगल कार्यालय, कुडाळ येथे सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर), मधुमेह (शुगर), किडनी व पोटाचे विविध विकार यांची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी वाई येथील गीतांजली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत त्याच ठिकाणी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील प्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार असून आधुनिक एआय तंत्रज्ञानयुक्त फंडस कॅमेऱ्याद्वारे डायबेटिक रेटिनोपथी, काचबिंदू तसेच मोतीबिंदू निदान केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार असून दर्जेदार चष्मेही अल्प दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
याचबरोबर घोटवडेकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने अस्थिरोग व स्त्रीरोग तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी आदी समस्यांवर मोफत तपासणी केली जाणार आहे. स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. गार्गी श्रेयस घोटवडेकर यांच्याकडून महिलांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
तसेच ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी ‘वयवंदना कार्ड’ काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यक शस्त्रक्रिया महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन ‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, कुडाळ (पंचशील नगर)’ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अध्यक्ष भीमराव (आप्पा) कांबळे, मंडळातील पदाधिकारी राजेंद्र (नाना) जगताप, कार्याध्यक्ष उमेश कांबळे आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अमर यादव (7507300577), मनोज कांबळे (9562400231), सुशांत कांबळे (9049474118), दशरथ कांबळे (8806374191) तसेच नोंदणीसाठी प्रवीण कांबळे (9594631982) यांच्याशी संपर्क साधावा.
न्यूज मराठी लाईव्ह
कुडाळ / जावली

टिप्पणी पोस्ट करा