कराड प्रतिनिधी | श्री.राहुल पवार
कराड : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी (Fair and Remunerative Price) अदा न केल्याने रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांशी पत्रव्यवहार करत आठ दिवसांत एफआरपी न दिल्यास संबंधित कारखान्यांवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा करून आदर्श निर्माण केला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांकडून अजूनही संपूर्ण रक्कम देण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर सचिन नलवडे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “येत्या सोमवारपर्यंत उर्वरित साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा करावी. अन्यथा मंगळवारपासून संबंधित कारखान्यांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
दरम्यान, पूर्ण एफआरपी दिल्याबद्दल रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सुरेश बाबा भोसले आणि जयवंत शुगरचे विनायक भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कराड उत्तर अध्यक्ष विशाल पुस्तके, कराड दक्षिण अध्यक्ष अशोक लोहार, अनिकेत ठोंबरे, नितीन शिर्के, संतोष कणसे, सचिन नांगरे, प्रसाद धोकटे, शंकर आतकारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“गेल्या तीन-चार वर्षांत कृष्णा सहकारी साखर कारखान्याने ऊसदराची कोंडी फोडत शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला आहे. त्यामुळे जसे आम्ही ऊसदरासाठी आंदोलन करतो, तसेच योग्य दर देणाऱ्या कारखान्यांचा सत्कारही करतो. ज्यांनी अद्याप एफआरपी दिली नाही, त्यांनी चार दिवसांत ती अदा करावी, अन्यथा त्यांच्या कारखान्यांवर आंदोलन अपरिहार्य ठरेल.” – सचिन नलवडे
न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा