श्री क्षेत्र मामुर्डी येथे हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

प्रतिनिधी मेढा (जावली) | श्री.बजरंग चौधरी 


मामुर्डी (जावली) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र मामुर्डी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे यंदा ४६ वे वर्ष मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरे होत आहे. हा सोहळा रविवार दि. १२ एप्रिल ते १९ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

“॥ इवलेशे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी ॥” तसेच “तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम” या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून जाणार आहे.

या सोहळ्यास ह.भ.प. अतुल महाराज देशमुख (गांजे) यांचे मार्गदर्शन लाभत असून व्यासपीठ संचालन ह.भ.प. वियुष महाराज जाधव व ह.भ.प. कार्तिक महाराज दुंदळे करणार आहेत. गायनाचार्य म्हणून ह.भ.प. विराज महाराज गुरव, ह.भ.प. उदयराज महाराज महाडिक, ह.भ.प. स्वराज महाराज शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प. सौरभ महाराज धनावडे व ह.भ.प. आयुष महाराज धनावडे सहभागी होणार आहेत.

काकडा व कीर्तन साथीसाठी विश्वंभर बाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, मेढा तसेच श्री केदारेश्वर भजन मंडळ, मामुर्डी यांचे सहकार्य लाभणार आहे. विविध मान्यवर वारकरी महाराजांची उपस्थिती या सप्ताहात राहणार आहे.

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, हरिपाठ, ज्ञानेश्वरी वाचन, प्रवचन आणि हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनासाठी ह.भ.प. किसन महाराज जुनघरे, ह.भ.प. यशवंत महाराज वाटेगावकर, ह.भ.प. सरिताताई दळवी, ह.भ.प. दीपेश महाराज जाधव, ह.भ.प. अनिल महाराज तोरणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच कीर्तनसेवेत ह.भ.प. विराज महाराज गुरव, ह.भ.प. ज्ञानराज महाराज शेलार, ह.भ.प. आनंद महाराज कदम, ह.भ.प. साहिल महाराज राजगे, ह.भ.प. संदिप महाराज लोहर, ह.भ.प. रवि महाराज पार्टे यांचा सहभाग असणार आहे.

सप्ताहात दररोज हरिजागराचे आयोजन विविध भजन मंडळांकडून करण्यात येणार असून परिसरातील अनेक गावांतील भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग राहणार आहे.

रविवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता सरपंच ग्रामपंचायत मामुर्डी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. अतुलजी महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी ३ ते ५ या वेळेत माऊलींचा दिंडी सोहळा काढण्यात येणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी ग्रामदैवत श्री केदारेश्वर व हनुमान मंदिराच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा, मोफत आरोग्य शिबीर, भजन, महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, शिवव्याख्यान (कु. सायली प्रमोद भोसले) तसेच सत्कार समारंभ व महाप्रसादाचा समावेश आहे.

या सप्ताहामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय होणार असून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ मामुर्डी यांनी केले आहे.




न्यूज मराठी लाईव्ह | मेढा / जावली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने