महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा आयोजित ‘विवेकी संयुक्त जयंती उत्सव’

सातारा प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी 


सातारा : दि. 10 एप्रिल 2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा शाखेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती (11 एप्रिल) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) निमित्त 11 ते 15 एप्रिल दरम्यान पाच दिवसीय ‘विवेकी संयुक्त जयंती उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या दोन महान समाजपुरुषांचे विचार विवेकी आचरणातून समाजापुढे मांडणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती सातारा शहर शाखा कार्यकारिणीने दिली.

उत्सवाच्या माध्यमातून समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी व सामाजिक जागर निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

उत्सवातील कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे :

शनिवार, दि. 11 एप्रिल :
सकाळी 11 वाजता परिवर्तन संस्था, सातारा येथे सत्यशोधकी विवाह संपन्न होणार आहे. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विशेषांकाचे प्रकाशन राज्य अध्यक्षा प्रा. प्रमोदिनी मंडपे यांच्या हस्ते होणार आहे.

रविवार, दि. 12 एप्रिल :
सकाळी 8 ते सायं. 8 या वेळेत सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, सातारा येथे ‘अभ्यास करणे स्पर्धा’ या विवेकी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आदर्श पुढे नेण्यासाठी ही स्पर्धा होणार आहे.

सोमवार, दि. 13 एप्रिल :
सायंकाळी 7 वाजता माजगाव (चाफळ) येथे ‘चमत्काराची दुनिया, विज्ञानाची किमया’ हा विज्ञानप्रबोधनात्मक कार्यक्रम राज्य सहकार्यवाह भगवान रणदिवे व सहकारी सादर करणार आहेत.

मंगळवार, दि. 14 एप्रिल :

1. सकाळी 11 वाजता पाडळी (सातारा रोड) येथे ‘विज्ञान की छद्म विज्ञान’ हा उपक्रम मानसिक आरोग्य राज्य कार्यवाह वंदना माने, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने व सहकारी सादर करतील.


2. सकाळी 11 वाजता ‘हसत खेळत विज्ञान’ हा कार्यक्रम राज्य सहकार्यवाह भगवान रणदिवे सादर करणार आहेत.



बुधवार, दि. 15 एप्रिल :
सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत आय.टी.आय., सातारा येथे ‘जास्त अभ्यास स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे नियोजन माजी जिल्हा प्रधान सचिव शशिकांत सुतार करत आहेत.

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर घडविणाऱ्या या प्रबोधनपर उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा शहर शाखा कार्यकारिणीने केले आहे.


न्यूज मराठी लाईव्ह | सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने