सातारा–महाबळेश्वर रस्त्यावर अपघातांची मालिका; तात्काळ उपाययोजनांची मागणी

मेढा प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी

सातारा : सातारा–महाबळेश्वर मार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या रस्त्यावर तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याची गरज तीव्रतेने व्यक्त होत आहे. या मार्गावर पुरेशा प्रमाणात इशारा फलक नसणे, तसेच गावांच्या ठिकाणी रम्बल स्ट्रिप्स (स्पीड ब्रेकर) नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भात मेढा नगरपंचायतच्या नगरसेविका सौ. मोनिका प्रमोद जवळ यांनी तब्बल तीन महिन्यांपूर्वी प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. या निष्काळजीपणाचे गंभीर परिणाम समोर येत असून, काल घडलेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत रस्त्यावर स्पीड ब्रेकर, रम्बल स्ट्रिप्स व आवश्यक इशारा फलक बसवावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा, शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) स्मरणपत्रही देण्यात आले आहे.

“यापुढे अशा अपघातांमध्ये कोणाचा जीव गेला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा स्पष्ट इशारा नगरसेविका सौ. मोनिका प्रमोद जवळ यांनी दिला आहे.


न्युज मराठी लाईव्ह | मेढा / जावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने