कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : शहरातील विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्त्यांनी कराड नगरपरिषद प्रशासनाला महत्त्वाचे स्मरणपत्र सादर केले आहे. शहरातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी दर महिन्याला ‘जनता दरबार’ भरविण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब लांडगे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवकांनी दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी व लोकनियुक्त नगराध्यक्ष यांना हे स्मरणपत्र दिले. यामध्ये २९ डिसेंबर २०२५ रोजी सादर केलेल्या अर्जावर अद्याप कोणतेही लेखी उत्तर मिळाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. जवळपास तीन महिने उलटूनही कार्यवाही न झाल्याने संबंधित मागण्यांवर तातडीने जनरल मिटिंगमध्ये ठराव मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्मरणपत्रात नगरपरिषद कारभार अधिक पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त करण्याबरोबरच नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे, यावर भर देण्यात आला आहे. बाराडबरी परिसरातील झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे देणे, सर्व झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करून फोटो पास वितरण करणे आणि पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करणे, या मुद्द्यांवरही विशेष लक्ष वेधण्यात आले आहे.
तसेच शहरातील भाजी विक्रेते, खोकीधारक, सफाई कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना हक्काची जागा व निवास सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देयके तातडीने अदा करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विकासकामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करत, इस्टिमेटनुसार कामे होत आहेत का याची नियुक्त निरीक्षकांकडून प्रत्यक्ष पाहणी करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे आणि नियमित गुणवत्ता अहवाल घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नगरपरिषद पटांगणात ‘जनता दरबार’ आयोजित करण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर केला असून, येत्या ३० मेपासून या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आवश्यक जागा उपलब्ध करून सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
या स्मरणपत्रावर बापूसाहेब लांडगे, शांताराम (दादा) थोरवडे, गणेश कापसे, निवास माने, अशोक भोसले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
न्यूज मराठी लाईव्ह | कराड / सातारा

टिप्पणी पोस्ट करा