प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
जावली : खर्शी-बारामुरे गणातील अंगनवाडी सेविकांच्या विविध व्यावसायिक अडचणी सोडवण्यासाठी जावली पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडीक यांनी पुढाकार घेत सक्रिय भूमिका बजावली आहे. करहर येथे आयोजित विशेष बैठकीत अंगनवाडी सेविकांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेत त्यांच्या निराकरणासाठी ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत कार्यरत अंगनवाडी सेविकांनी बैठकीत आपल्या समस्या मांडताना सुविधांचा अभाव, कामकाजातील अडथळे, मानधनातील प्रश्न तसेच विविध प्रशासकीय अडचणींमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट केले. या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत उपसभापती गोरख महाडीक यांनी या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा केला जाईल, असे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांच्या सहकार्याने या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अंगनवाडी सेविकांच्या अडचणींबाबत प्रशासन स्तरावर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीस बाल विकास प्रकल्प अधिकारी शैला दिनकर खामकर, पर्यवेक्षिका प्रेरणा कठाळे, स्मिता पोरे तसेच पत्रकार सदिक सय्यद उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अंगनवाडी सेविकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयातून प्रयत्न करण्याची भूमिका मांडली.
उपसभापती गोरख महाडीक यांनी अंगनवाडी सेविकांना दिलासा देत त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. या पुढाकारामुळे एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा होऊन अंगनवाडी सेविकांना अधिक सुलभ आणि सक्षम कार्य वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह | मेढा / जावली

टिप्पणी पोस्ट करा