कुडाळ (ता. जावली) : जावली तालुक्यातील सर्वात मोठा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ गावातील बाजारपेठेत यंदा प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, पंचशील नगर’ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत बाजारपेठेत अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी गावातील राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह पंचशील नगरमधील उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराजा शिवाजी हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांनी सकाळी साडेनऊ वाजता उपस्थित राहून महामानवांना अभिवादन केले. पंचायत समिती सभापती सौरभ बाबा शिंदे, माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, प्रतापगड कारखान्याचे संचालक राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय केंजळे, उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामपंचायत सदस्य धरेशं शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर स्वामी मंगल कार्यालय येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये सुमारे २५ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
१५ एप्रिल रोजी पुण्यातील बुधरानी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिर तसेच घोटावडेकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत अस्थिरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
त्याच दिवशी आयोजित अभिवादन सभेत भीमगीतांचा कार्यक्रम रंगला. गायक राजेंद्र जाधव (भिवडी) व सागर वराट (वाई) यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी वातावरण भारावून गेले. प्रसिद्ध वक्ते प्रशांत यादव यांनी उपस्थितांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष भीमराव कांबळे, उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, कार्याध्यक्ष दशरथ कांबळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
दरवर्षी कुडाळ बाजारपेठेत हा जयंती महोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जाईल, असा विश्वास कार्याध्यक्ष दशरथ कांबळे यांनी व्यक्त केला.
न्यूज मराठी लाईव्ह | कुडाळ / जावली





टिप्पणी पोस्ट करा