प्रतिनिधी | श्री. बजरंग चौधरी
सातारा : महाराष्ट्राचे लोकनेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दुर्दैवी निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपला ३० मार्च २०२६ रोजीचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. अभ्यासू, मनमिळावू, हरहुन्नरी आणि सडेतोड स्वभावाचे धडाडीचे नेतृत्व काळाने आपल्यातून हिरावून नेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अजितदादांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून ही घटना अजूनही अनेकांना पटत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
“अजितदादा हे केवळ माझे मित्रबंधू नव्हते, तर माझे मार्गदर्शक होते. माझ्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहकार्यामुळे सातारा-जावली मतदारसंघासह संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली,” असेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर, दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या भावना लक्षात घेऊन आपण यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत, फ्लेक्स, फलक, बॅनरबाजी टाळावी आणि कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा, हार, बुके किंवा भेटवस्तू देऊ नयेत, असे विनम्र आवाहन त्यांनी केले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

टिप्पणी पोस्ट करा