प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बुधवार पेठ परिसरात धाड टाकून गांजा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन संशयितांना रंगेहात अटक करण्यात आली असून तब्बल २ किलो ३३६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ५८ हजार ७०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांना बुधवार पेठेत गांजा विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला. कराड शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यावेळी सोन्या उर्फ शुभम दिलीप पवार व जगन्नाथ महिपती भोसले या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात गांजा हस्तगत करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत हा गांजा कराड शहर व परिसरात विक्रीसाठी आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरातील अंमली पदार्थांच्या जाळ्याचा विस्तार गंभीर असल्याचे समोर आले असून पोलिसांनी तपास अधिक सखोल करण्यास सुरुवात केली आहे.
दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या समन्वयाने सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम तसेच संताजी जाधव, असिफ जमादार, प्रविण पवार, सागर बर्गे, मयुर देशमुख, अनिकेत पवार आणि दिग्विजय सांडगे यांच्या पथकाने पार पाडली.
दरम्यान, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या कारवाईचे कौतुक करत, “कराडमध्ये अंमली पदार्थ विक्रेत्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल,” असा इशारा दिला आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा




टिप्पणी पोस्ट करा