प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे
कराड : महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ हेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात करण्यात आला.
महिलांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी देशभरातील १४ वर्षे वयोगटातील मुलींना “गार्डासिल” ही लस मोफत देण्यात येणार आहे. ही लस टप्प्याटप्प्याने शाळा तसेच सरकारी आरोग्य केंद्रांमार्फत दिली जाणार असून, या मोहिमेमुळे भविष्यात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही हा अत्यंत सामान्य विषाणू असून गर्भाशयमुखाच्या कर्करोगासाठी तो प्रमुख कारणीभूत ठरतो. योग्य वयात लसीकरण केल्यास या कर्करोगापासून सुमारे ८० ते ९० टक्क्यांपर्यंत संरक्षण मिळू शकते.
तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, लवकर वयातील संबंध, अनेक जोडीदार, धूम्रपान तसेच कमकुवत रोगप्रतिकारशक्ती ही गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेवर लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे.
“गार्डासिल” लसीची बाजारातील किंमत सुमारे ३,९२७ रुपये असून शासनाकडून ही लस मोफत उपलब्ध करून दिली जात असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या शुभारंभप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मा. लालासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्या मा. सौ. कोमल यादव, माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे, हेळगावचे विद्यमान सरपंच मा. मिलिंद पाटील (बापू), उपसरपंच शिवाजी चोरमले, ग्रामपंचायत सदस्य वैभव इंगळे, ज्येष्ठ नागरिक किसन पाटील (आबा), रविभाऊ सूर्यवंशी, लाभार्थी मुली व त्यांचे पालक, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
न्यूज मराठी लाईव्ह
कराड / सातारा


टिप्पणी पोस्ट करा