फलटण (प्रतिनिधी) : बुद्ध, शिव, शाहू, फुले, आंबेडकर आणि कांशीराम यांच्या विचारांनी प्रेरित होऊन बहुजन चळवळीत सातत्याने कार्य करणारे फलटण तालुक्यातील युवा नेतृत्व प्रदीप उर्फ प्रेम जयश्री सुरेश मोरे यांची राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल कल्याण संरक्षण परिषद या संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्याध्यक्ष तसेच प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
बहुजन समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि धार्मिक प्रश्नांवर सातत्याने काम करणारे प्रेम मोरे हे बहुजन समाज पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून गेली सुमारे १७ वर्षे त्यांनी पक्षासाठी विविध पदांवर काम केले आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या “एक नेता, एक पक्ष, एक झेंडा, एक निशाण” या विचारांना समर्पित राहून त्यांनी बहुजन चळवळ मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
प्रेम मोरे यांनी २०१७ मध्ये कोळकी पंचायत समिती, २०१९ मध्ये २५५ फलटण विधानसभा मतदारसंघ, तर २०२६ मध्ये कोळकी व बरड जिल्हा परिषद गटातून बहुजन समाज पार्टीच्या हत्ती चिन्हावर निवडणुका लढवल्या आहेत. तसेच ते सामाजिक कार्यातही सक्रिय असून हिरानाना फाउंडेशन आणि भारतमाता महिला नारीनिकेतन संस्था यांचे संचालन करतात. ग्रामपंचायत स्तरावर विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, ग्रामपंचायत ऑपरेटर व ग्रामरोजगार सेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
पत्रकारितेचा अनुभव आणि संविधानिक विचारसरणीच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान, राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषदचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उद्योजक रामकृष्ण बनसोडे तसेच महिला प्रदेश अध्यक्षा भालेराव ताई यांच्या हस्ते नाशिक येथील कार्यालयात प्रेम मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. सुप्रिया प्रदीप मोरे यांची पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्तीनंतर प्रेम मोरे यांना नवीन पदनियुक्ती समिती तयार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असून त्यांच्या पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.
न्यूज मराठी लाईव्ह
फलटण / सातारा

टिप्पणी पोस्ट करा