प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मुंबई : जावली तालुक्यातील ५४ गावांना पिण्याचे व शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या बोंडारवाडी धरण चळवळीला आता पुनर्वसन सेवा संघाचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. कण्हेर धरण पुनर्वसित संघटना, सह्याद्रीनगर (इसबावी), ता. पंढरपूर यांच्या वतीने हा पाठिंबा देण्यात आला आहे.
मुंबई येथे रविवार (दि. १५ मार्च २०२६) रोजी आयोजित मेळाव्यात बोंडारवाडी धरण कृती समितीला लेखी स्वरूपात पाठिंबा देण्यात आला. या पत्राद्वारे संघटनेने पुढील आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
संघटनेचे सचिव सागर जवळ यांनी यावेळी सांगितले की, कण्हेर धरणातून शिल्लक राहिलेल्या शेती क्षेत्राला तसेच धरणाच्या वरच्या भागातील गावांना पिण्याचे व शेतीसाठी पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असून पुढील चळवळीतही आम्ही सहभागी राहणार आहोत.
दरम्यान, बोंडारवाडी धरण कृती समितीच्या आंदोलनाला विविध स्तरांतून मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहता ही चळवळ अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मुंबई


टिप्पणी पोस्ट करा