प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मेढा (ता. जावली) : येथील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ वाजता कलश मंगल कार्यालय, मेढा येथे हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पार्टे, कार्याध्यक्ष नारायण शिंगटे आणि सचिव धनंजय पवार यांनी दिली.
दरवर्षी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या वाचनालयामार्फत केला जातो. यावर्षीच्या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अध्यक्षस्थानी राहणार असून, मुंबईचे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी, लेखक-कवी प्रा. आनंद साठे, जेष्ठ पत्रकार व नाट्य-टिव्ही कलाकार धनराज जगताप, मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. रूपाली वारागडे व उपनगराध्यक्ष विकास देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२ ते १ या वेळेत “जावली साहित्य प्रेमी” यांच्या सहकार्याने नवोदित कवींच्या काव्य संमेलनाने होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा तसेच मेढा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यावर्षीचा मानाचा स्व. विजयराव मोकाशी स्मृती “जलयोद्धा पुरस्कार” उद्योजक राजेंद्र धनावडे (केळघर) यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच “जीवन गौरव पुरस्कार” पांडुरंग जवळ (मेढा) यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुढील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत—
▪️जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार : दीपक मुरलीधर लंगडे (दहिवडी)
▪️आदर्श शिक्षिका पुरस्कार : सौ. सुनीता अजय दिघे (आंबेघर तर्फ कुडाळ)
▪️आदर्श ग्रंथपाल पुरस्कार : राजेंद्र काशिनाथ माने (सातारा)
▪️आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार : शाहीर श्रीरंग रणदिवे (सदर बाजार, सातारा)
▪️आदर्श माता पुरस्कार : सौ. रत्ना शेलार (ओखवडी), श्रीमती लक्ष्मी शेडगे (मेढा)
▪️यशस्वी उद्योजक पुरस्कार : विजय कारंजकर (अमृता उद्योग समूह)
▪️आदर्श शिक्षिका पुरस्कार : सौ. सुनीता कामटे (ढेरेवाडी)
▪️आदर्श शेतकरी पुरस्कार : पांडुरंग देशमुख (मेढा)
▪️आदर्श महिला वाचक पुरस्कार : सौ. गौरी ओंबळे, कु. वर्षा देशमुख, श्रुती शिंदे
या कार्यक्रमास संस्थेचे सभासद, हितचिंतक, ग्रामस्थ तसेच पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे कुटुंबीय यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक समिती अध्यक्षा शोभा शेडगे, सहसचिव प्रकाश परांजपे, ग्रंथपाल आशा मगरे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा