धोम धरणातून १ एप्रिलला पाणी सोडण्याची मागणी; शेतकऱ्यांचा संघर्ष समितीचा इशारा


सातारा : धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन १ एप्रिल रोजी तातडीने सोडण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. 

या संदर्भात समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रावसाहेब बर्गे, कार्याध्यक्ष रणजीत शिवाजीराव फाळके, तसेच सहकारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दगडू माने-पाटील यांनी सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे.

समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उन्हाळी हंगामातील पाणी वाटपासाठी आवश्यक असलेली कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही. मात्र, या बैठकीच्या कारणास्तव पाणी सोडण्यास विलंब करू नये. मागील वर्षी बैठक न झाल्याने तब्बल एक महिना उशिरा पाणी सोडण्यात आले होते, ज्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

सध्या वाढत्या उष्णतेमुळे शेतीसाठी पाण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. पाणी सोडण्यास थोडाही विलंब झाल्यास धोम डावा कालव्यावरील पिके वाळण्याचा धोका निर्माण होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणतेही कारण न देता १ एप्रिल २०२६ रोजी धोम धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांना पहिले आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच एप्रिल, मे आणि जून या कालावधीत तीन आवर्तने देण्याची मागणीही वाई, सातारा, जावली आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. अधिक्षक अभियंत्यांना एक आवर्तन सोडण्याचे अधिकार असल्याने त्या अधिकाराचा वापर करून निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वेळेत पाणी मिळाल्यास पिकांचे संभाव्य नुकसान टळेल आणि सिंचन व्यवस्थेवर ताण येणार नाही, असे सांगत संघर्ष समितीने प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती केली आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
सातारा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने