सातारा : काल अध्यक्षपदासाठी निवडणूक होती. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती होती. दोघांचे मिळून 35 सदस्य निवडून आले. भाजपचे 27 होते. पण भाजपला कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपद हवे होते.
एका बाजूला मंत्री शंभुराज देसाई, मकरंद पाटील आणि दुसऱ्या बाजूला शिवेंद्रराजे आणि जयकुमार गोरे.
दोन्ही बाजूचे सदस्य गेले महिनाभर अज्ञातस्थळी होते. भाजपने पूर्ण ताकद लावली. पोलिस आणि प्रशासनं तर लाज आणली, असं स्थानिक पत्रकार ज्यांनी हे उघड्या डोळ्यांनी पाहिले ते सांगतायत.
सदस्य चौथ्या मजल्यावर आणण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना अक्षरशः जीव पणाला लावावा लागला.
एनसीपीच्या दोन सदस्यांच्या नातेवाईकांना हाताशी धरून ते गायब असल्याची तक्रार आधीच केली गेली असा आरोप आहे.
जे सदस्य गायब आहेत अशी तक्रार होती, ते दिसताच १०-१५ पोलिस त्याला पकडायला धावले. हात-पाय धरून ओढत होते. शंभूराज आणि मकरंद पाटील त्यांना सभागृहात नेण्यासाठी धडपडत होते. पोलिस थेट मंत्र्यांच्या अंगावर धावून गेले. झटापटीत पालकमंत्री शंभूराज देसाई जखमी झाले. हाताला जखम झाली, रक्तस्त्राव सुरू झाला. ज्या सदस्याला ओढत नेला त्याचे कपडे फाटले..
एका कॅबिनेट मंत्र्याने तर थेट सदस्यांच्या कॉलरला धरून दमदाटी करत, परिणाम वाईट होतील अशी धमकी दिल्याचे स्थानिक पत्रकार सांगतायत.
अखेर भाजपचा अध्यक्ष झाला… कोण ?? तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी.
कारण त्यांनी भाजपकडून निवडणूक लढली होती.
केंद्रात, राज्यात सगळीकडे भाजप-शिनसेनेची युती आहे. पण एका ZP साठी दोन पक्षात अक्षरशः गॅंगवॉर सारखी स्थिती झाली.
मंत्र्यांच्या अंगावर पोलिस धावले, कैबिनेट मंत्री दमदाटी करत चक्क गुंडासारखं वर्तन करत होते, हे तिथे हा सगळा प्रसंग पाहणारे सांगतायत.
तीनही पक्ष सत्तेतील, चारही मंत्री उद्या कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसतील.
पण यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाची परंपरा असलेल्या साताऱ्यात ZP इलेक्शनमधे जे झाले ते बघून कृष्णेचा काठ हळहळला असेल.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

टिप्पणी पोस्ट करा