प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मेढा : कोरेगाव येथील विकास सेवा सोसायटीच्या सचिवावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जावळी तालुका गटसचिव संघटनेतर्फे आजपासून तालुक्यातील सर्व सेवा सोसायट्यांचे कामकाज बंद ठेवून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कण्हेरखेड विकास सेवा सोसायटीवर कार्यरत असलेले सचिव दयानंद तुकाराम खाडगे यांनी संस्थेचे कर्जदार सभासद रमेश आनंद शिंदे यांच्या ऊस बिलातून कपात होऊन आलेली रक्कम त्यांच्या कर्ज खात्यात जमा केली होती. याच कारणावरून काही जणांनी सचिव खाडगे यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
या घटनेचा जावळी तालुका गटसचिव संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला असून दोषींवर त्वरीत कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, जावळी तालुक्याचे सहाय्यक निबंधक तसेच जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी यांना जावळी तालुका गटसचिव संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. सचिवांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून त्यांना न्याय मिळावा, यासाठी तालुक्यातील सर्व सेवा सोसायट्यांचे कामकाज बंद ठेवून आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल धनावडे यांनी दिली.
निवेदन देताना अध्यक्ष अनिल धनावडे यांच्यासह मनोज देशमाने, सुनिल धनावडे, गणेश वंजारी, संतोष यादव, अमोल सुतार, सुनिल महामुलकर, आनंदा शेलार, विनोद जुनघरे, अनिल ससाने, दीपक महामुलकर, दत्तात्रय जाधव, हरीश शिंदे, संजय धनावडे, सौ. नीलम सुतार, विठ्ठल शेलार आदी सचिव उपस्थित होते.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment