प्रतिनिधी | बजरंग चौधरी
मेढा : सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या मौजे गोंदेमाळ (ता. जावली, जि. सातारा) येथे स्व. सु. नि. सदगुरू जोग महादाज यांच्या कृपा-आशीर्वादाने व वै. ह.भ.प. हरिभाऊ चोरगे महाराज यांच्या प्रेरणेने सालाबादप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा तसेच शांतीब्रह्म नाथ महाराज जलसमाधी सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह यावर्षी ४६ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
हा धार्मिक सोहळा फाल्गुन कृ. २ गुरुवार दि. ५ मार्च २०२६ ते फाल्गुन कृ. ९ गुरुवार दि. १२ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. सप्ताहाचे व्यासपीठ चालक दत्तात्रय महाराज साबळे (मेरुलिंग) असून मृदंगमणी म्हणून सुभाष महाराज, शौरभ महाराज धनावडे, बबन सपकाळ महाराज व पार्थ पार्टे सेवा देत आहेत.
काकडा व हरिपाठासाठी सुरेश महाराज पार्टे, हनुमंत महाराज पार्टे व अशोक महाराज शिंदे कार्यरत आहेत. गवई म्हणून विजय महाराज शेलार, अशोक महाराज शिंदे, हनुमंत महाराज पार्टे, पांडुरंग महाराज सपकाळ व अभिषेक महाराज कराड हे सेवा बजावत आहेत. तर चोपदार म्हणून आनंदा पार्टे, लक्ष्मण पार्टे व ज्ञानदेव पार्टे कार्य पाहत आहेत.
दैनंदिन कार्यक्रम
दररोज पहाटे ५ ते ७ काकड आरती, सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, तर रात्री ९ ते ११ किर्तन आणि त्यानंतर हरिजागर असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दि. ५ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संत तुकाराम बीज निमित्त किर्तन हनुमंत महाराज पार्टे यांचे होणार आहे. तसेच दि. ९ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत नाथषष्टी निमित्त किर्तन सुरेश महाराज पार्टे यांचे आयोजित करण्यात आले आहे.
या सप्ताहात सुरेश महाराज पार्टे (गोंदेमाळ), आनंद मिस्त्री (कुसुंबी), कृष्णात महाराज तरडे (बामणोली), धोंडीराम महाराज सपकाळ (लाखवड), कृष्णात महाराज कदम (मालचौंडी), बाळकृष्ण महाराज शिंदे (निपाणी), प्रविण महाराज शेलार (आंबेघर) यांची प्रवचने व किर्तने होणार आहेत.
सप्ताहाची सांगता गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत विजय महाराज शेलार यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.
या पारायण सोहळ्यास वागदरे, म्हाते बु., मामुर्डी, तांबी, सावली, म्हाते खुर्द, मोहाट, गवडी, गाळदेव, जयभवानी नगर, कोळीवारसोळी आदी गावांमधून हरिजागर होणार असून अनेक किर्तनकार, प्रवचनकार व अन्नदाते यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ गोंदेमाळ मुंबई, श्री काळभैरवनाथ नेहरू युवा मंडळ गोंदेमाळ, नवतरुण मंडळ गोंदेमाळ मुंबई, राजे ग्रुप युवा मंच गोंदेमाळ व महिला मंडळ गोंदेमाळ यांचे सहकार्य लाभत असून सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


Post a Comment