प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मेढा : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांना प्रशासक म्हणून संधी मिळाल्याचे मत मेढा नगरीचे सुपुत्र दत्ता आण्णा पवार (मेढेकर) यांनी व्यक्त केले.
जावली तालुक्यातील तब्बल ७२ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून ग्रामविकास अधिकारी किंवा टिपीओ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता होती. मात्र, अशा नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवरील विकासकामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात होती. गावाशी थेट नाळ जुळलेले आणि स्थानिक गरजा जाणणारे विद्यमान सरपंच यांनाच प्रशासकपदी नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने विकासाला गती मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
“ही संधी निश्चितच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सोनेरी ठरेल. अल्प कालावधीतही गावातील प्रलंबित नागरी सुविधा, मूलभूत प्रश्न आणि विकासकामे मार्गी लावण्याचा अधिकार आता सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे तातडीने कामांना सुरुवात होऊन गावांचा विकास वेगाने होईल,” असे त्यांनी नमूद केले.
या निर्णयाबद्दल महाराष्ट्र शासनाचे तसेच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या राज्य व जिल्हा पदाधिकाऱ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.
दत्ता आण्णा पवार हे माजी ग्रामपंचायत सदस्य मेढा, माजी जिल्हा परिषद सदस्य सातारा तसेच माजी उपनगराध्यक्ष, नगर पंचायत मेढा म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक राजकीय व प्रशासकीय वर्तुळात समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment