भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामकृष्ण वेताळ यांची नियुक्ती

कराड प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे

कराड : कराड उत्तरचे युवा नेते म्हणून ओळख निर्माण केलेले रामकृष्ण वेताळ यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच ही घोषणा केली. या निवडीमुळे वेताळ समर्थक आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


रामकृष्ण वेताळ यांनी यापूर्वी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, सातारा जिल्हा उपाध्यक्ष तसेच कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक अशी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. प्रत्येक पदावर त्यांनी केलेल्या प्रभावी कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात संघटनबांधणीसाठी घेतलेले परिश्रम आणि तळागाळातील भक्कम संपर्क यामुळे त्यांना राज्य पातळीवरील ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून त्यांना संघटनेतून निष्कासित केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र या नव्या नियुक्तीमुळे राज्यातील वरिष्ठ नेत्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.

वेताळ यांच्या निवडीमुळे शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न अधिक प्रभावीपणे शासनदरबारी मांडले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी शासनाला मार्गदर्शन करण्याची भूमिका ते निभावतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे कराड उत्तर मतदारसंघात समाधानाची लाट उसळली आहे.


शेती आणि शेतकरी समृद्धीसाठी कटिबद्ध

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून वरिष्ठांनी दाखविलेला विश्वास पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे रामकृष्ण वेताळ यांनी सांगितले. शेतकरी व शेतीसंबंधीच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून ठोस उपाययोजना राबविण्यासाठी किसान मोर्चा प्रभावी भूमिका बजावेल. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे कार्य देशासाठी आदर्श ठरेल, असे काम करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post