सातारा | प्रतिनिधी
सातारा : दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी पाणी सोडण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयाविरोधात धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना ही चारमाही (खरीप) स्वरूपाची असून, पावसाळ्यात वाहून जाणारे ३.१७ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी वापरण्याची तरतूद आहे. या योजनेसाठी स्वतंत्र पाणी साठवण टाकी अथवा जलसाठा उपलब्ध नाही. खरीप हंगामासाठी धोम-बलकवडी धरणातून केवळ ०.५३ टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
जलसंपत्ती विभागाच्या दि. ३० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार, जिहे-कठापूर योजना ही पावसाळ्यातील ‘फ्री कॅचमेंट एरिया’तील पाण्यावर आधारित असून १४ ऑक्टोबरपर्यंतच नदीपात्रातून पाणी उपसा करण्याची परवानगी आहे. त्यानंतर या योजनेस पाणी उपसण्यास स्पष्ट बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरण (MWRRA) च्या दि. ०१ एप्रिल २०१९ व दि. ०९ एप्रिल २०१९ च्या निकालपत्रानुसारही जिहे-कठापूर योजना चारमाहीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी धोम-बलकवडी धरणातून पाणी सोडता येणार नसल्याचे निर्देश आहेत. त्यामुळे सध्याचे पाणी सोडणे हे नियमबाह्य असल्याचा समितीचा आरोप आहे.
यंदा जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत धोम धरणातून ५.५२६ टीएमसी पाणी कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आल्याची नोंद असून, त्यामुळे धोम लाभक्षेत्रातील सिंचन व्यवस्था बाधित होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू शकतात, असेही समितीने नमूद केले.
संघर्ष समितीने असा सवाल उपस्थित केला आहे की, कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे यापूर्वी शेतकऱ्यांना पाणी देण्यास नकार देण्यात आला होता, मग सध्याचे पाणी कोणत्या नियमांनुसार व कोणाच्या परवानगीने सोडण्यात आले?
धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने तातडीने पाणी सोडणे बंद करण्याची मागणी केली असून, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. तसेच हक्कांच्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासन जबाबदार राहील, असा इशारा समितीने दिला आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

Post a Comment