सातारा | प्रतिनिधी
सातारा : जिल्ह्यातील जावली आणि वाई तालुक्यातील ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या आखाडे–हुमगाव–वाघजाईवाडी–झगडेवस्ती–बावधन बगाड या मार्गाच्या दर्जोन्नतीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंजुरी दिली आहे. या मार्गाला आता प्रमुख जिल्हा मार्गाचा (एमडीआर) दर्जा देण्यात आला असून, ग्रामीण दळणवळण अधिक सक्षम, सुलभ आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.
पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या प्रस्तावानुसार तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या ठरावानुसार या मार्गाच्या दर्जोन्नतीचा सविस्तर विचार करण्यात आला. वाढती वाहतूक, परिसरातील गावांची संख्या आणि स्थानिक लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी हा निर्णय घेतला.
शासन निर्णयानुसार आखाडे–हुमगाव–वाघजाईवाडी–झगडेवस्ती–बावधन बगाड या रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १८१ देण्यात आला आहे. या मार्गाची एकूण लांबी १२.८०० कि.मी. असून जावली व वाई तालुक्यातील अनेक गावांना याचा थेट लाभ होणार आहे.
प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व विस्ताराच्या कामांना गती मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास आणि दैनंदिन दळणवळण अधिक सोयीस्कर होणार आहे.
रस्त्याच्या विकासासाठी आवश्यक जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे असल्याची खात्री करूनच पुढील कामे हाती घेतली जाणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था सुधारल्यास पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या दर्जोन्नतीमुळे सातारा जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांची एकूण लांबी ४०५०.७४५ कि.मी. झाली असून ग्रामीण मार्गांची लांबी ६४,८०.१३५ कि.मी. इतकी राहणार आहे. ग्रामीण भागातील रस्ते मजबूत करून दुर्गम वस्त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. या मार्गाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
सातारा

Post a Comment