मेढा | प्रतिनिधी
मेढा (जावली) : कोकणाला जोडणाऱ्या पाचवड ते खेड या राज्य महामार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असताना ठेकेदाराकडून आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचा आरोप वाहनधारकांकडून केला जात आहे. या हलगर्जीपणामुळे वारंवार अपघात घडत असून वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मानकुमरे पॉईंटजवळ MH 14 MV 7307 क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीचा अंदाज न आल्यामुळे घसरून एका बाजूला धडकली व पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालकाला गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने ठेकेदाराच्या कामकाजाबाबत वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या कामादरम्यान ठिकठिकाणी खडीचे ढीग टाकण्यात आल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात उडणाऱ्या धुळीमुळे रस्ता नेमका कुठे आहे, हे ओळखणेही कठीण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नसल्याचा आरोप नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनधारकांना धुळीचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदाराने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रस्त्यावर पाणी मारण्याच्या कारणास्तव डबडेवाडी येथून वाहणाऱ्या धोम उजवा कॅनॉलमधून खुलेआम पाणी उपसा केला जात असल्याची चर्चा स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. संबंधित प्रशासनाने याची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली



Post a Comment