प्रतिनिधी | श्री.बजरंग चौधरी
मेढा : कबड्डीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या बिभवी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, बिभवी (ता. जावली) येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवाणी व फौजदारी न्यायालय मेढा यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन दिनानिमित्त जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, ॲड. एन. एस. पवार, ॲड. ए. के. शेटे, प्रशांत इंगळे, कवयित्री जयश्री माजगांवकर, बिभवीचे सरपंच संतोष बांदल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, अध्यक्ष संदीप देशमुख तसेच मुख्याध्यापक अशोक लकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विक्रम आव्हाड यांनी मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपणे, तिचे संवर्धन व प्रसार करणे आणि नव्या पिढीमध्ये मातृभाषेचा अभिमान निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “आपण सर्वांनी मराठी भाषा जपण्याचा व दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्प करूया,” असे आवाहन त्यांनी केले.
कवयित्री जयश्री माजगांवकर यांनी मराठी भाषेची थोरवी सांगितली. ॲड. पवार मॅडम व ॲड. शेटे मॅडम यांनी मराठी साहित्याचा गौरव आणि मराठी अस्मितेबाबत मनोगत व्यक्त केले. प्रशांत इंगळे यांनी कविता गायन सादर केले.
मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी प्रास्ताविकात ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांची माहिती देत मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड व उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. दिपाली दुंदळे यांनी आभार प्रदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात “लेखक आणि कवी आपल्या भेटीला” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिपाली दुंदळे यांनी कवयित्री जयश्री जगताप व कवयित्री योगिता जगताप यांचा परिचय करून दिला. दोन्ही कवयित्रींनी विद्यार्थ्यांना लेखनकला, कविता कशी सुचते व कशी तयार होते याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कविता तयार करून घेतल्या. योगिता जगताप यांनी विद्यार्थ्यांना ५१ पुस्तके भेट देत वाचन संस्कृतीला चालना दिली. शाळेच्या वतीने या नवोदित कवयित्रींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शेवटच्या सत्रात अखिल भारतीय डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघ यांचे जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे व संगिता शिराळे यांनी शाळेला विशेष भेट दिली. त्यांनी मराठी साहित्यातील विविधतेवर प्रकाश टाकत मराठीचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. तसेच शिक्षकांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना खाऊ व पेनचे वाटप केले. अमिता एरंडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अशोक लकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका दिपाली दुंदळे, अमिता एरंडे, अंगणवाडी सेविका स्नेहल देशमुख, सुमल बांदल तसेच शालेय मंत्रिमंडळ यांनी परिश्रम घेतले.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली


Post a Comment