बनवडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्ट सत्तेचा अंत; तत्कालीन सरपंच प्रदीप पाटील अपात्र

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे 


२४×७ पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार उघड; विभागीय आयुक्तांचा कठोर आदेश

कराड : बनवडी ग्रामपंचायतीत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, मनमानी कारभार आणि लोकशाही मूल्यांच्या पायमल्लीला अखेर चाप बसला आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार बनवडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप मोहन पाटील यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३९(१) अन्वये अपात्र ठरवत पदमुक्त करण्यात आले आहे.

बनवडी गावातील २४×७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नागरिकांकडून वसूल करण्यात आलेल्या पाणीबिलांच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता. यासंदर्भात झालेल्या सखोल चौकशीनंतर ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर आर्थिक अनियमितता, कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर तसेच अधिकारांचा गैरवापर झाल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, तत्कालीन सरपंचांच्या समर्थनार्थ सात ग्रामपंचायत सदस्यांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे तपासाअंती खोटी व दिशाभूल करणारी ठरल्याने ती फेटाळून लावण्यात आली असल्याचेही विभागीय आयुक्तांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हा आदेश केवळ प्रशासकीय कारवाई नसून लोकांच्या कष्टाच्या पैशांचा गैरवापर करणाऱ्यांसाठी एक कठोर इशारा असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व तक्रारदारांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी या कथित गैरकारभाराबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत होता. मात्र, “सत्य कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी ते उघडकीस येतेच,” हे या निर्णयामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा गावात रंगली आहे.

या निर्णयानंतर संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच, ज्ञानदेवतेसमोर खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याच्या आरोपाखाली विद्यमान सरपंच अश्विनी शिवराज विभुते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे बनवडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्ट साखळीला मोठा धक्का बसला असून, हा निर्णय म्हणजे जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. यानिमित्ताने नागरिकांनी अधिक सजग राहून लोकशाही मूल्यांचे रक्षण करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post