प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त म्हाते खुर्द येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री भैरवनाथांचा ५१ वा वार्षिक भंडारा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९ वाजता श्री भैरवनाथ मंदिर येथून पालखी सोहळ्याची सुरुवात होणार असून पालखी पहाटेपर्यंत महाबळेश्वर येथे पोहोचणार आहे.
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ (महाशिवरात्री) रोजी सकाळी ८ वाजता पालखी आगमनानंतर म्हाते हायस्कूल ते मंदिर असा भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून सायंकाळी प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख कार्यक्रमांचे वेळापत्रक
सायं. ५ ते ६ – ह.भ.प. श्री. संतोष महाराज दळवटे यांचे प्रवचन
सायं. ६ ते ७ – हरिपाठ : विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, आंबेघर
रात्र ७ ते ९ – ह.भ.प. भगवाताचार्य हरिदास महाराज पौळ शास्त्री यांचे कीर्तन
रात्र ९.३० ते १.३० – प्रा. योगेश मणिकराव चिकटगावकर (मुंबई विद्यापीठ) यांचे भारुड व लोककला सादरीकरण
सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे काकड आरती, दुपारी काल्याचे कीर्तन व त्यानंतर भव्य दिंडी सोहळा होणार असून दुपारी ३ ते ५ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भजन मंडळांचा सहभाग
पंचक्रोशीतील म्हाते बु., गोंदेमाळ, वागदरे, गाळदेव, मामुर्डी, मोहाट, म्हाते मुरा, चोरांबे, करंजे, सावली, गांजे, डांगरेघर आदी गावांतील भजन मंडळांचा सुस्वर भजन कार्यक्रम होणार आहे.
आयोजन व आवाहन
हा धार्मिक सोहळा ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत म्हाते खुर्द, नेहरू युवा मंडळ, नवयुग विकास मंडळ (मुंबई-ठाणे), महिला मंडळ तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसाद सौजन्याने प्रदीप ज्ञानदेव दळवी आणि चंद्रकांत हरिबा दळवी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.
या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच राजाराम दळवी यांनी केले आहे.
न्यूज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment