कराडमध्येही उभारणार २० कोटींचा ‘उमेद मॉल’; मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

प्रतिनिधी | श्री.अनिल मोरे 

कराड : साताऱ्यासोबतच कराडमध्येही सुमारे २० कोटी रुपये खर्चून ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने आयोजित ‘मिनी सरस मानिनी जत्रा २०२६’चे उद्घाटन कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती, कराड च्या बैल बाजार मैदानावर मंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. ही जत्रा २१ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रकल्प संचालक विश्वास सिद, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, अनिल वाघमारे, विजय विभुते, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

महिलांना वर्षभर बाजारपेठ उपलब्ध करून देणार

यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की देशातील सर्व लाडक्या बहिणी लखपती व्हाव्यात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग सातत्याने कार्यरत आहे. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहेत.”

महिलांनी ‘सरस’सारख्या उपक्रमांमधून केवळ चार-पाच दिवस नव्हे, तर वर्षभर उत्पादनांची विक्री करता यावी यासाठी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर व सातारा येथे ‘उमेद मॉल’ उभारणीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कराड हेही महत्त्वाचे व्यापारी केंद्र असल्याने येथे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सुमारे २० कोटी रुपये खर्चून ‘उमेद मॉल’ उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

महिलांना मोठा व्यवसाय उभारायचा असल्यास जिल्हास्तरीय प्रशासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहील. गरज पडल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अवजार बँकेचे उद्घाटन

उमेद अंतर्गत स्थापित वसुंधरा महिला प्रभाग संघ (काळे) आणि कस्तुरी महिला प्रभाग संघ (सैदापूर) या दोन्ही संघांना अवजार बँकेसाठी प्रत्येकी ८ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीतून ट्रॅक्टर व शेतीपूर्व मशागत तसेच आंतरमशागत कामांसाठी उपयुक्त अवजारे खरेदी करण्यात आली आहेत.

या अवजार बँकेचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे व आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास सिद यांनी केले. सूत्रसंचालन दीपक तडाखे यांनी तर आभार प्रदर्शन अंकुश मोटे यांनी केले.

कराडमध्ये उभारण्यात येणारा ‘उमेद मॉल’ महिलांसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ निर्माण करणार असून, ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना मोठी चालना मिळणार आहे.


न्यूज मराठी लाईव्ह 
कराड / सातारा 

Post a Comment

Previous Post Next Post