मेढा : जावली तालुक्यातील ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करून गुन्ह्यातील दोन ट्रॅक्टरसह एकूण ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात मेढा पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी फिर्यादी अजित मोहन दुदुस्कर (वय ४०, रा. मोरेवाडी, पो. दरेखुर्द, ता. जावली, जि. सातारा) यांच्या नावावरील महेंद्र कंपनीचा ओजा २७ एच.पी. ट्रॅक्टर (क्र. एमएच ११ डीएन २३३७) हा अजय संतोष चव्हाण (रा. सरताळे, ता. जावली, जि. सातारा) याने हप्ते भरण्याची नोटरी करून घेतला. मात्र, त्याने हप्ते न भरता तो ट्रॅक्टर दुसऱ्या व्यक्तीकडे देऊन फिर्यादीची फसवणूक केली.
तसेच, या गुन्ह्यातील साक्षीदार दत्तात्रय रामचंद्र चव्हाण (रा. म्हसवे, ता. जावली) यांचा कॅप्टन कंपनीचा २८३ 4WD मॉडेल ट्रॅक्टर (क्र. एमएच ११ डीए ५२०६) देखील अशाच प्रकारे फसवणूक करून नेल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून दि. २६ जानेवारी २०२६ रोजी मेढा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. १७/२०२६ भा.न्या.सं.का. २०२३ कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तुषार दोशी (पोलीस अधीक्षक, सातारा), वैशाली कडुकर (अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा) व सुनिल साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई विभाग) यांनी मार्गदर्शन करून आरोपीस तात्काळ अटक व मुद्देमाल जप्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार तपासादरम्यान आरोपी अजय संतोष चव्हाण (वय २३) यास दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे १.२९ वाजता अटक करण्यात आली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, मेढा यांच्यासमोर हजर केले असता दि. २१ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस कोठडीदरम्यान चौकशीत आरोपीने दोन्ही ट्रॅक्टर कांतीलाल अर्जुन होन (रा. साई सिटी, श्रीराम पार्क, सी/१९, कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांना दिल्याची कबुली दिली. त्यानुसार पंचनामा करून पुढीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला —
1. महेंद्र ओजा २७ एच.पी. ट्रॅक्टर – किंमत ५,९५,००० रुपये
2. कॅप्टन २८३ 4WD ट्रॅक्टर – किंमत ३,२०,००० रुपये
अशा एकूण ९,१५,००० रुपयांच्या किमतीचे दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पो.हवा. प्रमोद निकम, पो.कॉ. सनी काळे, सूरज वाघमळे, सुनिल वाघमळे, ओंकार दीक्षित, ओंकार चव्हाण व अजय गुरव यांनी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
न्युज मराठी लाईव्ह
मेढा / जावली

Post a Comment